आव्हान चिनी ड्रॅगनचे

आव्हान चिनी ड्रॅगनचे

पुणे -
        ब्रिगेडीअर हेमंत महाजन लिखित  'आव्हान चिनी ड्रॅगन चे ' या संशोधनपर पुस्तकाचे प्रकाशन समारंभ रविवार दि २० ऑक्टो २०१३ रोजी सायंकाळी ६ वाजता पुण्यातील बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सच्या टाटा सभागृहा मध्ये होणार आहे.  
भारत सरकारचे माजी गृहसचिव श्री माधव गोडबोले यांच्या हस्ते प्रकाशन होणार असून यावेळी लेफ्टनंट जनरल द. बा. शेकटकर आणि एअर मार्शल भूषण गोखले उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी चीनच्या युद्धामध्ये ज्या शूर सैनिकांनी शौर्य गाजवले अशा सैनिकांचा व त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात येणार आहे . १९६२ चे चिनी आक्रमण, भारत -चीन संबंधाचे आजचे स्वरूप, २०१५-२० साली चीन सोबत युद्ध होईल का अशा विषयांचा उहापोह  करण्यात आला आहे. 

निवडणूक लढवत आहोत कि कुस्ती याचे भान देखील साहित्यिकांना राहिली नाही - राज ठाकरे

निवडणूक  लढवत आहोत कि कुस्ती याचे भान देखील साहित्यिकांना राहिली नाही - राज ठाकरे

गुरुवार ,पुणे


     मराठी समृद्ध आहेच परंतु ती व्यवस्थितपणे सर्वसामान्य लोकापर्यंत पोहचवली जाणे गरजेचे आहे . परदेशात खाद्य संस्कृती देखील कटाक्षाने पाळली जाते परंतु आपल्याकडे खाद्य संस्कृती तर सोडाच पण आपल्या मातृभाषेच्या जतनाकडे देखील दुर्लक्ष केले  जाते अशी खंत माननीय राज ठाकरे यांनी व्यक्त केली . ते गुरुवारी टिळक स्मारक येथे ऐसी अक्षरे मासिकाच्या दशकपूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
 गेल्या काही वर्षात साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदाची निवडणूक हि कलह व वादा विना पार पडतच नाही . निवडणूक  लढवत आहोत कि कुस्ती याचे भान देखील साहित्यिकांना राहिली नाही . त्यामुळे वर्षात सर्वात जास्त पुस्तके ज्या साहित्यिकाची विकली जातील त्यास अध्यक्ष पद बहाल करावे असे देखील राज यांनी मिश्कील  पणे  सुचवले .

"ऐसी अक्षरे मासिकाची दशकपूर्ती "
टिळक स्मारकात पार पडलेल्या ' ऐसी अक्षरे  मासिकाच्या  दशकपूर्ती  कार्यक्रमासाठी मा . राज ठाकरे ,मासिकाचे सर्वे सर्वा बेलवलकर बंधू ,एबीपी  माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर, जेष्ठ लेखिका मोनिका गजेंद्रगडकर व मासिकाचे मुख्य संपादक पद्मनाभ हिंगे उपस्थित होते. 
     राजीव खांडेकर यांनी मराठी भाषेचे भवितव्य काय? या गंभीर प्रश्नावर त्यांचे विचार मांडले. मराठी भाषेच्या तोकड्या वापराचा दोष हा माध्यमे व साहित्य लेखनातील चुकांमुळे निर्मान झाला असल्याचे त्यांनी दाखल्यासहित स्पष्ट करून दाखविले. माध्यमे त्यांना सोयीची व हवी तेवढीच मराठी शब्द वापरत असतात त्यामुळे समृद्ध असे पर्यायी शब्द लोप पावत असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. इंग्रजी व हिंदी भाषेचा वापर करणे हे उच्चभ्रू लोकांचे लक्षण आहे अस न्यूनगंड मराठी माणसाच्या हाडामासात बिंबला आहे, असे ते म्हणाले. याप्रसंगी ऐसी अक्षरे मासिकाच्या अथिती संपादिका मोनिका गजेंद्रगडकर ह्यादेखील उपस्थित होत्या. "संवेदनक्षम जगण आपण विसरत आहोत" असे त्या म्हणाल्या. 
    कार्यक्रमाची सांगता व आभार प्रदर्शन मासिकाचे मुख्य संपादक पद्मनाभ हिंगे यांनी केले. 

सिंधुताई सपकाळ यांचा पुणे महानगर पालिकेतर्फे सत्कार

सिंधुताई सपकाळ यांचा पुणे महानगर पालिकेतर्फे सत्कार 

पुणे - सन्मती बाल संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष अनाथ आणि उपेक्षित बालकांच्या संगोपनाचे कार्य करणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचा गौरव पुणे महापालिकेतर्फे खास मानपत्र देऊन करण्यात आला. "अनाथांसाठी कार्य करत असताना माझे आतापर्यंत अनेक  सत्कार झाले, पण त्या ज्या गावात माझी संस्था आहे त्या ठिकाणी माझा सत्कार झाल्यामुळे मला मायेचा हात मिळाला त्यामुळे हा सत्कार मला मोलाचा  वाटतो ", असे मत सिंधुताई सपकाळ यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले. 
         पुण्याच्या महापौर सौ. चंचला कोद्रे आणि सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते सपकाळ यांचा सन्मान करण्यात आला. "पत्रवाळीतील एक घास समाजातील मोठ्या लोकांनी बाजूला ठेवला नाही, तर उद्या आपल्या ताटात घास राहणार नाही"  अशी खंत सिक्किमचे राज्यपाल श्रीनिवास पाटिल यांनी  व्यक्त केली .  ते पुढे म्हणाले, "अनाथ मुलांना पोटाशी धरून त्यांना मायेची उब देतांनाच अशा मुलांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम सिंधुताईनी केले." याप्रसंगी उपमहापौर बंडू गायकवाड, नगरसेवक आबा बागुल, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे यांची प्रमुख उपस्थिती  होती.  

पुस्तक प्रदर्शन सुरु

पुस्तक प्रदर्शन सुरु 

पुणे - 'पुणे बुक फेअर' च्यावतीने गणेश कला क्रीडा मंच,स्वारगेट येथे पुस्तक प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात केंद्र सरकार व राज्य सरकारने प्रकाशित केलेल्या तसेच इतर काही प्रसिद्ध प्रकाशन संस्थेची पुस्तके, विविध वृत्त्तपत्र समूहांची पुस्तके पहावयास मिळतील. 
     या पुस्तक प्रदर्शनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे बरचशी पुस्तके वाचकांसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. या पुस्तक प्रदर्शनाला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून २०ऑक्टोबर पर्यंत हे प्रदर्शन खुले राहील. हे प्रदर्शन सकाळी दहा ते रात्री आठच्या दरम्यान खुले राहील. 

पुण्यात होणार रौप्यमहोत्सवी बालकुमार साहित्य संमेलन

पुण्यात होणार रौप्यमहोत्सवी बालकुमार साहित्य संमेलन 
प्रशांत दामले यांच्या हस्ते संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण 

पुणे - "प्रत्येक मूल हे स्वतंत्र संमेलन असते, लहान मुलांमुळे घरातले वातावरण देखील उत्साही राहते. त्यामुळे त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा बाल कुमार साहित्य संमेलनाची गरज आहे", असे मत प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले. 
  संवाद संस्थेच्या वतीने पुण्यात होणाऱ्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण बुधवारी दामले यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. संवादचे अध्यक्ष सुनील महाजन, निकिता मोघे, नवीन इंदलकर, ल. म. कडू आदी यावेळी उपस्थित होते. गेली २४ वर्षे हे संमेलन दरवर्षी भरवण्यात येते. आतापर्यंत सोलापूर, जळगाव, इचलकरंजी, सातारा, परभणी, संगमनेर अशा महाराष्ट्रातील विविध भागांत ते झाले आहे. दि. २९, ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे हे संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. 

देवाचा विसावा अखेर वानखेडेवरच ….


देवाचा विसावा अखेर वानखेडेवरच ….


मुंबई - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची अखेरची कसोटी वानखेडे

स्टेडीयमवर १४ ते १८ नोव्हेंबर दरम्यान खेळविण्यात येईल, असा निर्यण
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतला आहे. या सामन्याच्या वेळी सचिनला
खास निरोप देण्यात येईल.
          माझा आतापर्यंतचा एकही सामना माझ्या आईने बघितलेला नाही. माझा
अखेरचा सामना बघावा अशी इच्छा तिची आहे. तब्येतीमुळे तिला प्रवास शक्य नाही.
यामुळे अखेरचा सामना वानखेडे स्टेडीयमवर खेळविण्यात यावा, अशी विनंती
सचिनने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला केली होती. या विनंतीचा विचार करून
दौरा समितीने विंडीज बरोबरची दुसरी कसोटी वानखेडे स्टेडीयमवर खेळविण्याचे
ठरविले.
दौरा कार्यक्रम
२८ ऑक्टोबर - विंडीज संघाचे आगमन
३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर - त्रिदिवसीय सराव सामना - कटक
६ ते १० नोव्हेंबर - पहिला कसोटी सामना - कोलकाता
१४ ते १८ नोव्हेंबर - दुसरा कसोटी सामना - मुंबई
२१ नोव्हेंबर - पहिला एकदिवसीय सामना - कोच्ची
२४ नोव्हेंबर - दुसरा एकदिवसीय सामना - विशाखापट्टनम
२७ नोव्हेंबर - तिसरा एकदिवसीय सामना - बडोदा किंवा कानपूर



विंडोज ८.१ संगणक प्रणाली लवकरच बाजारात

विंडोज ८.१ संगणक प्रणाली लवकरच बाजारात
    
       मायक्रोसोफ्टची नवीन संगणक प्रणाली "विंडोज ८.१" १८ ऑक्टोबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या संगणक प्रणालीचे नाव आधी "विंडोज ब्लू" असे ठेवण्यात आले होते. "विंडोज ८" संगणक प्रणालीच्या वापरकर्त्यांना या संगणक प्रणालीचे उपडेट्स मोफत उपलब्ध होणार आहेत. 
       "विंडोज ८.१" चा प्रिव्यू वर्जन याआधीच मायक्रोसोफ्टने सादर होता. या प्रिव्यू वर्जनचा अभिप्राय वापरकर्त्यांकडून मागविण्यात  होता. सर्व अभिप्रायांवर विचार करून अखेर "विंडोज ८.१" ची निर्मिती करण्यात आली. 
विंडोज ८.१ ची काही वैशिष्टे 
१. लॉक स्क्रीनवर स्लाईडशो 
२. सुधारित बिंग शोधप्रणाली 
३ . सुधारित युजर इंटरफेस 
४. सुधारित विंडोज स्टोर 
५. नवीन वेगवान इंटरनेट एक्स्प्लोरर 


अरे हे चाललंय तरी काय ?

अरे हे चाललंय तरी काय ?

तमाम देशवासीय आज रामनामाचा जप करत असताना देशात क्षणाक्षणाला स्त्रियांचा अपमान होत आहे. वर्तमानपत्र उघडा किंवा दूरचित्रवाणी संच लावा.  सगळीकडे ह्या संदर्भातील बातम्याच दिसतात. खून, बलात्कार, हुंडाबळी, विनय भंग . . . यादी वाढतच चालली आहे .
हे सर्व वाचून बघून चीड येते व हताशपणासुद्धा जाणवतो. आज आपण इतके क्रूर, हिंस्र झालो का आहोत? हे चालालंय तरी काय? कधी थांबणार हे? लोकांना माणुसकीची शिकवण द्यायला देवालाच पुन्हा एकदा जन्म घ्यावा लागणार बहुतेक . 

प्रवास महागला

प्रवास महागला

पुणे - १२ दिवासांवरती दिवाळी येऊन ठेपली असताना खाजगी बसच्या प्रवास भाड्यामध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे. ही भाडेवाढ अकस्मात जरी नसली तरी दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांना हवालदिल करणारी नक्कीच आहे. सर्व बाजूंनी भडकलेल्या महागाईच्या भस्मासुरामुळे ही वाढ महत्त्वाची मानली जात आहे. 
          पुणे-लातूर प्रवास भाडे याआधी निम आराम साठी ४००/- रु आणि स्लीपर साठी ४५०/- रु होते.  ते वाढून प्रत्येकी ४५०/- व ५००/- रु झाले आहे आणि या वाढीव भाड्यात अजून दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच पुणे-नागपूर या मार्गावर चालणाऱ्या खाजगी वाहनांचे भाडे देखील कडाडले आहे. सध्या प्रवास भाडे प्रत्येकी १०००-१२००/-रु असून हेच प्रवास भाडे दिवाळी दारम्यान १५००-२५००/- रु प्रती प्रवासी पोचण्याची चिन्हे आहेत. 

गेला मनोहर कुणीकडे

गेला मनोहर कुणीकडे 

         दसरा महोत्सवाला शिवसेनेच्या व्यासपीठावर जे घडले याची साक्षीदार संपूर्ण मुंबई आहे . मनोहर जोशी यांनी केलेल्या पक्ष नेतृत्वावरील टीकेचे पडसाद दसरा महोत्सवात उमटले आणि  आपल्याच पक्षाच्या कार्यक्रमातुन,व्यासपीठावरून चालते व्हावे लागले. पक्षातील जेष्ठ नेते भर कार्यक्रमातुन चालते झाले तरी त्यांना कुणी नेत्यांनी थाबवण्याचा प्रयत्न पण केला नाही. हा पाणउतारा पाहून एकच गोष्ट ध्यानात येते कि माणसाला केव्हा  आणि कुठे  थांबायचे हे जर लक्षात आल नाही तर त्याचे परिणाम किती भयंकर असू शकतात .

अन्नासाठी दाही दिशा

अन्नासाठी दाही दिशा 


१६ ऑक्टोबर हा दिवस जागतिक अन्न दिवस म्हणून साजरा केला जातो . अन्न -वस्त्र -निवारा  ह्या माणसाच्या तीन मूलभूत गरजा. माणूस समाजात एकत्र राहायला लागल्यापासून ह्या मूलभूत गरजा आहेत  आणि अन्नाशिवाय तर जगताच येणार नाही.  
परंतु अन्न ह्या महत्वाच्या गरजेविषयी जागृतीसाठी एखादा दिवस पाळावा लागतोय ही खरेतर  आपल्यासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे.  जगाच्या एकूण लोकसंख्येच्या  जवळपास निम्म्या लोकसंख्येबाबत योग्य पोषणाच्या समस्या आहेत. आफ्रिका खंड, दक्षिण -पूर्व आशिया खंड, मध्य -दक्षिण अमेरिका ह्या भागातील बऱ्याचशा  देशांमध्ये अन्न विषयक समस्या खूप गंभीर आहेत . 
आफ्रिका आणि भारतीय उपखंडामध्ये तर ही समस्या खूपच गंभीर स्वरूपाची आहे. मध्यंतरी संयुक्त राष्ट्रसंघ  आणि काही माध्यमांनी मिळून केलेल्या अभ्यासामध्ये भारतातील परिस्थीतीवर तीव्र चिंता व्यक्त केली गेली. भारतातील ४० ते ५०% जनता अर्धपोटी असते, त्यांना पुरेशा प्रमाणात पोषण मूल्य असलेला आहार मिळत नाही. भूकबळीच्या बाबतीत आफ्रिकी देशांनंतर भारताचा क्रमांक लागतो. कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्युंचे प्रमाणही भारतात जास्त आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, ओडिशा  ह्या राज्यांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्रात मेळघाट, मोखाडा व इतर आदिवासी भागांमध्ये कुपोषणामुळे दरवर्षी हजारो बाल मृत्यू होतात.
कुपोषणाबरोबरच प्रसूतीदरम्यान किंवा प्रसूतीनंतर होणाऱ्या बालमृत्युंची संख्याही अधिक आहे.
आपल्या देशात खाण्या -पिण्याच्या बाबतीतही भेदभाव आढळून येतो. मुलगा आणि मुलगी ह्यांना मिळणाऱ्या पोषण आहारामध्ये कमालीची तफावत आढळते. तरुण मुली, स्त्रियांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण जास्त दिसून आले आहे. मातांना योग्य प्रमाणात आहार न मिळाल्यामुळे होणारे बालमृत्यू आणि बाळांच्या अपंगत्वाचे प्रमाणही लक्षणीय आहे .
आपल्या देशात अन्नविषयक समस्या निर्माण होण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यातील महत्वाची आणि विचार करण्याजोगी कारणे म्हणजे, वाढती लोकसंख्या, भ्रष्टाचार, अन्न -धान्याचे अनियोजित वितरण, अन्न -धान्य साठवणुकीसाठी आणि वाहतुकीसाठी योग्य साधनांचा अभाव इत्यादी .
ह्या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने अनेक तऱ्हेच्या योजना अमलात आणल्या, परंतु ढिसाळ कारभार व भ्रष्ट्राचारामुळे एकही योजना यशस्वी होऊ शकली नाही. आगदी पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून आपण ह्या समस्येवर मात करण्यासाठी उपाययोजना करत आहोत. तरीही आज निराशादायक चित्र समोर आहे.
निवडणुका समोर ठेवून सवंग प्रसिद्धीसाठी सरकारने वाजत गाजत खाद्यान्न विधेयक आणले ते संसदेमध्ये पाससुद्धा करवून घेतले. आता ते प्रत्यक्ष लागू झाल्यावरच त्याचे यश-अपयश कळेल. पण सध्याच्या सरकारची कामगिरी बघून तरी ह्या विधेयकाची वाटचाल कठीण वाटतीये. पुन्हा तमाम उपाशी जनतेच्या नशिबात अन्नासाठी दाही दिशा भटकंती दिसत आहे.  

रानडेच्या आवारात सुखाने फुलतोय एक संसार

मराठी नाव - पिंगळा ,घोगड , घुबड 
शास्त्रीय नाव - अथेने ब्रमा 
इंग्रजी नाव - स्पोटेड आऊलेट 
खाद्य - छोटे उंदीर, पाली, सरडे, बेडूक इ .
इतर वैशिष्ट्ये - पिंगळा हा संपूर्ण दक्षिण आशिया खंडात आढळतो.  शेती तसेच मानवी वस्ती जवळ रहातो. ह्याने शहरीकरणाशी जुळवून घेतले आहे .
पिंगळा ही घुबडाची सर्वात लहान जात. ह्यांची लांबी सुमारे २१ सेमी लांब असते. पाठीकडील भाग मातकट असून त्या वरील ठिपके पांढरे असतात. पोटाकडील भाग पांढरा असतो.  ज्या ठिकाणी अन्न मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल असे ठिकाण घरटे करण्यासाठी निवडले जाते .
झाडाच्या ढोलीत किंवा घर, बिल्डिंगच्या कपारीमध्ये  घरटे केले जाते. मादी घरट्यामध्ये तीन ते पाच अंडी घालते. नर मादी दोघे मिळून पिल्लांचे संगोपन करतात
मानवी वस्ती जवळ खाण्याची चंगळ असल्यामुळे हा सुंदर असा पक्षी मानवी वस्तीजवळ नेहमी आढळून येतो .



टू जी इंटरनेट सेवा दरात वाढ

टू जी इंटरनेट सेवा दरात वाढ

                आयडिया सेल्युलर, वोडाफोन व भारती एअरटेल या देशातील प्रमुख कंपन्यांनी टू जी  इंटरनेट सेवेच्या दरात वाढ केली आहे. ही दरवाढ १ जीबीसाठी २५% पर्यंत आहे. या निर्णयामुळे ग्राहकांचे खिसे रिकामे होणार आहेत.
     व्हाट्सएप, ट्विटर, फेसबुकच्या वापरकर्त्यांना याचा चांगलाच फटका बसणार आहे. या वर्षातील ही दुसरी दरवाढ आहे. मोबाईल इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही वाढती मागणी व मूलभूत गरज ओळखून ही दरवाढ करण्यात आली आहे.
नवे दर ( दिल्ली विभागाकरिता )
आयडिया - १ जीबी - रु १५४ - २८ दिवस वैधता
                                         एअरटेल - १ जीबी - रु. १५६ - ३० दिवस वैधता
                                         वोडाफोन - १ जीबी - रु. १५५ - ३० दिवस वैधता

साहित्य संमेलनाध्यक्षपदी फ. मुं. शिंदे यांची निवड

साहित्य संमेलनाध्यक्षपदी फ. मुं. शिंदे यांची निवड 
पुणे - सासवड येथे होणाऱ्या ८७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी प्रा. फ. मुं. शिंदे यांची निवड झाली. "हा सन्मान मी आईला अर्पित करतो" या शब्दात त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.  
    संमेलनाचे  अध्यक्षपद कुणाला मिळणार याकडे साहित्यिक जगताचे लक्ष होते. बुधवारी  सकाळी मतमोजणी सुरू  झाल्यापासून  साहित्य महामंडळाच्या कार्यालयात साहित्यिक मतदार व वाचकांनी गर्दी केली होती. दुपारी एकच्या सुमारास निवडणूक अधिकारी प्रमोद आडकर यांनी निकाल जाहीर केला. फमुंना ४६० मते तर त्यांच्या प्रतिस्पर्धी प्रभा गणोरकर यांना ३३१ मते मिळाली. अरुण गोडबोले (६० मते) आणि संजय सोनवणी (३९ मते) हे दोघे सुद्धा उमेदवार होते. एक हजार सत्तर मतदारांपैकी नऊशे चार जणांनी मतदान केले. यापैकी  ८९० मतपत्रिका वैध ठरल्या. या निवडीनंतर फमुंचा साहित्य महामंडळातर्फे सपत्नीक सत्कार करण्यात आला. 
थोडक्यात फमुं 
नाव : फकीरराव मुंजाजी शिंदे (साहित्याजगातासाठी "फमुं")
जन्म : १२ ऑगस्ट १९४८, रुपेर ( जिल्हा - हिंगोली )
व्यवसाय : प्राध्यापक (मराठी)
साहित्य : "आई ","आदिम","अवशेष","फकिरांचे अभंग". असे एकूण २७ काव्यसंग्रह 
भूषवलेली पदे : अध्यक्ष, मराठवाडा साहित्य संमेलन 
                    अध्यक्ष, आचार्य अत्रे साहित्य संमेलन 
                    अध्यक्ष, मराठी रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ

अप्पलचे नवीन आयपॅड २२ ऑक्टोबरला बाजारात

अप्पलच्या नवीन आयपॅडचे सादरीकरण २२ ऑक्टोबरला होणार आहे. हा कार्यक्रम सॅन फ्रान्सिस्को येथील "येर्बा ब्युएना सेंटर फॉर आर्ट्स" इथे सकाळी १० वाजता पासून सुरु होणार आहे. याविषयीची निमंत्रण पत्रिका अप्पलकडून प्रसार माध्यमाना आणि ब्लॉगर्सना देण्यात आली आहे. या पत्रिकेत   "We Still have a lot to cover" असे एक उत्कंठा वाढवणारे वाक्य आहे. हा कार्यक्रम फक्त खास निमंत्रीतासाठीच असणार आहे. या कार्यक्रमात आय पॅड ५ व आय पॅड मिनी २ या दोन मॉडेलचे सादरीकरण करण्यात येऊ शकते. 
आय पॅड ५ हा याआधीच्या आय पॅडपेक्षा आकाराने लहान व कमी जाडीचा असण्याची शक्यता आहे. आय पॅड मिनी २ मध्ये नवीन रेटीना डिस्प्ले असणार आहे. 

पुणे: काल आणि आज


पुणे: काल   आणि  आज 

पुणे म्हणजे महाराष्ट्राचे वैभव. जर कुणी विचारले , पुणे म्हणजे काय ? तर मनात एकच विचार येतो " या महाभागाला सांगावे तरी काय ?" पुणे हे नुसते शहर नसून ती एक ऊर्जा आहे आणि ती अनुभवावीच लागते. सांगून चालतच नाही . 
तरी पण जर पुणे म्हणजे काय ते शब्दात सांगायचे म्हटले तर "चमचमीत मिसळ म्हणजे पुणे, पेशवाईचा थाट म्हणजे पुणे,हिरवाई म्हणजे पुणे, सारसबाग म्हणजे पुणे, मानाचे गणपती म्हणजे पुणे, ढोल ताशाच्या गजरातील विसर्जन मिरवणूक म्हणजे पुणे, अंगात कोट-डोक्यावर टोपी म्हणजे पुणे, सावरकर, फुले, कर्वे यांची पुण्याई म्हणजे पुणे, केसरीची गर्जना म्हणजे पुणे, मराठीची स्थापना म्हणजे पुणे, हिवाळी थंडी म्हणजे पुणे, आळंदीची दिंडी म्हणजे पुणे, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी म्हणजे पुणे, शिवाजीमहाराजांची आई म्हणजे पुणे, आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणजे पुणे". 
         सांगावे तरी किती या पुण्याविषयी ? सांगाल तेवढे कमीच. या सर्वांगसुंदर पुण्याचा पाया घातला तो शहाजीराजे भोसले यांनी  सन १६२६ मध्ये यांनी मुळा -मुठा नदीच्या किनारी वसलेल्या एका छोट्या पुनवडी गावामध्ये. सुरुवातीला त्यांनी कसबा, सोमवार, रविवार, शनिवार या पेठा वसवल्या. आपले आराध्य दैवत शिवाजीमहाराजांची जडणघडण याच पुण्यात झाली. पुढे जाऊन शिवाजीमहाराजांनी गुरुवार, गणेश, घोरपडे या पेठा वसवल्या. मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ याच पुण्यात रोवली गेली. स्वराज्याची घौडदौड या पुण्याने पहिली . शनिवारवाडा, लालमहाल हे या स्वराज्य बांधणीचे मूक साक्षीदार म्हणून आजपण डौलात उभे आहेत . 
         सन १७२० मध्ये बाजीराव पेशवा यांच्याकडे पुण्याचा कारभार सोपवण्यात आला आणि पुण्यात पेशवाई रूढ झाली. पेशव्यांची मर्दानगी, साहस, स्वामीनिष्ठता जशी  या पुण्याने अनुभवली तशी त्यांची विलासी राहणी, रंग, उधळेपणा, अविकेकीपणादेखील या पुण्याने उघड्या डोळ्यांनी पहिला . 
     सन १८१७ मध्ये ब्रिटिशाविरुद्धचे खडकीचे युद्ध पेशवे हरले आणि पुण्याचा ताबा ब्रिटीश साम्राज्याकडे गेला.  आधुनिक शिक्षणाची मुहूर्तमेढ ब्रिटिशानी पुण्यात रोवली आणि शिक्षणाचे माहेरघर पुणे तयार झाले. पुण्यात आजपण ब्रिटीश काळातील शाळा -महाविद्यालये डौलात उभी आहेत आणि आधुनिक पिढीला शिक्षणाने समृद्ध करीत आहेत . 
      या शिक्षणाने, शैक्षणिक संस्थानी पुण्याचे नाव जगात अजरामर केले. पुण्याच्या शिक्षणपद्धतीचा गौरव जगात सुरू झाला. आज संपूर्ण जगभरातून विद्यार्थी पुण्यात येतात, स्वतः ला पुणेरी शिक्षणाने समृद्ध करायला. 
अनेक औद्यगिक कारखाने पुण्यात आले आणि त्यांनी पुण्याला वेगळेच वलय मिळवून दिले. 
         पुण्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला कामासाठी आता पुण्यातच संधी उपलब्ध झाल्या आहेत. आता शिवाजीमहाराजांच्या पुनवडीचा विस्तार इतका प्रचंड झाला आहे, की देशामधील मोजक्या मोठ्या शहरामध्ये पुण्याचे नाव आहे . 
           याच नावाबरोबर पुण्यात चालू झाला आहे शिक्षणाचा धंदा, बाजारीकरण. आता पुण्याच्या शिक्षणाचे माहेरघर या नावाला काळिमा फासला  जात आहे 
             व्यवसायाच्या वाढीसोबत लोकसंख्येच्या विस्फोटाने पुण्याचे हाल  केलेत. दररोज वाढणारे कारखाने व वाहनांनी पुण्याला प्रदूषित शहर करून टाकले आहे . वाहनांचा धूर, कारखान्यातील मैला पाणी, कचरा यांनी पुण्यातील हवापाणी बाधित करून टाकले आहे. या पुण्याच्या दुरवस्थेस  आपणही तेवढेच जबाबदार आहोत . 
             सुंदर हिरव्या पुण्याचे आपण काय करून टाकले आहे याची जाणीव पण अनेकांना नाही.  आता जर कुणी तुम्हाला विचारले पुणे म्हणजे काय? तर याची ओळख या आधी सांगितली तशी करून द्यायची की "प्रदूषण म्हणजे पुणे, मॉलसंस्कृती म्हणजे पुणे, श्रीमंताची मक्तेदारी म्हणजे पुणे, रस्त्याचे कोंडी म्हणजे पुणे, शिक्षणाचे बाजरीकरण म्हणजे पुणे, सिमेंटची जंगले म्हणजे पुणे, की टेकड्यावरील अतिक्रमण म्हणजे पुणे " अशी द्यायची? निर्णय तुमचा आहे.