पुणे: काल आणि आज
पुणे म्हणजे महाराष्ट्राचे वैभव. जर कुणी विचारले , पुणे म्हणजे काय ? तर मनात एकच विचार येतो " या महाभागाला सांगावे तरी काय ?" पुणे हे नुसते शहर नसून ती एक ऊर्जा आहे आणि ती अनुभवावीच लागते. सांगून चालतच नाही .
तरी पण जर पुणे म्हणजे काय ते शब्दात सांगायचे म्हटले तर "चमचमीत मिसळ म्हणजे पुणे, पेशवाईचा थाट म्हणजे पुणे,हिरवाई म्हणजे पुणे, सारसबाग म्हणजे पुणे, मानाचे गणपती म्हणजे पुणे, ढोल ताशाच्या गजरातील विसर्जन मिरवणूक म्हणजे पुणे, अंगात कोट-डोक्यावर टोपी म्हणजे पुणे, सावरकर, फुले, कर्वे यांची पुण्याई म्हणजे पुणे, केसरीची गर्जना म्हणजे पुणे, मराठीची स्थापना म्हणजे पुणे, हिवाळी थंडी म्हणजे पुणे, आळंदीची दिंडी म्हणजे पुणे, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी म्हणजे पुणे, शिवाजीमहाराजांची आई म्हणजे पुणे, आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणजे पुणे".
सांगावे तरी किती या पुण्याविषयी ? सांगाल तेवढे कमीच. या सर्वांगसुंदर पुण्याचा पाया घातला तो शहाजीराजे भोसले यांनी सन १६२६ मध्ये यांनी मुळा -मुठा नदीच्या किनारी वसलेल्या एका छोट्या पुनवडी गावामध्ये. सुरुवातीला त्यांनी कसबा, सोमवार, रविवार, शनिवार या पेठा वसवल्या. आपले आराध्य दैवत शिवाजीमहाराजांची जडणघडण याच पुण्यात झाली. पुढे जाऊन शिवाजीमहाराजांनी गुरुवार, गणेश, घोरपडे या पेठा वसवल्या. मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ याच पुण्यात रोवली गेली. स्वराज्याची घौडदौड या पुण्याने पहिली . शनिवारवाडा, लालमहाल हे या स्वराज्य बांधणीचे मूक साक्षीदार म्हणून आजपण डौलात उभे आहेत .
सन १७२० मध्ये बाजीराव पेशवा यांच्याकडे पुण्याचा कारभार सोपवण्यात आला आणि पुण्यात पेशवाई रूढ झाली. पेशव्यांची मर्दानगी, साहस, स्वामीनिष्ठता जशी या पुण्याने अनुभवली तशी त्यांची विलासी राहणी, रंग, उधळेपणा, अविकेकीपणादेखील या पुण्याने उघड्या डोळ्यांनी पहिला .
सन १८१७ मध्ये ब्रिटिशाविरुद्धचे खडकीचे युद्ध पेशवे हरले आणि पुण्याचा ताबा ब्रिटीश साम्राज्याकडे गेला. आधुनिक शिक्षणाची मुहूर्तमेढ ब्रिटिशानी पुण्यात रोवली आणि शिक्षणाचे माहेरघर पुणे तयार झाले. पुण्यात आजपण ब्रिटीश काळातील शाळा -महाविद्यालये डौलात उभी आहेत आणि आधुनिक पिढीला शिक्षणाने समृद्ध करीत आहेत .
या शिक्षणाने, शैक्षणिक संस्थानी पुण्याचे नाव जगात अजरामर केले. पुण्याच्या शिक्षणपद्धतीचा गौरव जगात सुरू झाला. आज संपूर्ण जगभरातून विद्यार्थी पुण्यात येतात, स्वतः ला पुणेरी शिक्षणाने समृद्ध करायला.
अनेक औद्यगिक कारखाने पुण्यात आले आणि त्यांनी पुण्याला वेगळेच वलय मिळवून दिले.
पुण्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला कामासाठी आता पुण्यातच संधी उपलब्ध झाल्या आहेत. आता शिवाजीमहाराजांच्या पुनवडीचा विस्तार इतका प्रचंड झाला आहे, की देशामधील मोजक्या मोठ्या शहरामध्ये पुण्याचे नाव आहे .
याच नावाबरोबर पुण्यात चालू झाला आहे शिक्षणाचा धंदा, बाजारीकरण. आता पुण्याच्या शिक्षणाचे माहेरघर या नावाला काळिमा फासला जात आहे
व्यवसायाच्या वाढीसोबत लोकसंख्येच्या विस्फोटाने पुण्याचे हाल केलेत. दररोज वाढणारे कारखाने व वाहनांनी पुण्याला प्रदूषित शहर करून टाकले आहे . वाहनांचा धूर, कारखान्यातील मैला पाणी, कचरा यांनी पुण्यातील हवापाणी बाधित करून टाकले आहे. या पुण्याच्या दुरवस्थेस आपणही तेवढेच जबाबदार आहोत .
सुंदर हिरव्या पुण्याचे आपण काय करून टाकले आहे याची जाणीव पण अनेकांना नाही. आता जर कुणी तुम्हाला विचारले पुणे म्हणजे काय? तर याची ओळख या आधी सांगितली तशी करून द्यायची की "प्रदूषण म्हणजे पुणे, मॉलसंस्कृती म्हणजे पुणे, श्रीमंताची मक्तेदारी म्हणजे पुणे, रस्त्याचे कोंडी म्हणजे पुणे, शिक्षणाचे बाजरीकरण म्हणजे पुणे, सिमेंटची जंगले म्हणजे पुणे, की टेकड्यावरील अतिक्रमण म्हणजे पुणे " अशी द्यायची? निर्णय तुमचा आहे.

Post a Comment