सिंधुताई सपकाळ यांचा पुणे महानगर पालिकेतर्फे सत्कार

सिंधुताई सपकाळ यांचा पुणे महानगर पालिकेतर्फे सत्कार 

पुणे - सन्मती बाल संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष अनाथ आणि उपेक्षित बालकांच्या संगोपनाचे कार्य करणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचा गौरव पुणे महापालिकेतर्फे खास मानपत्र देऊन करण्यात आला. "अनाथांसाठी कार्य करत असताना माझे आतापर्यंत अनेक  सत्कार झाले, पण त्या ज्या गावात माझी संस्था आहे त्या ठिकाणी माझा सत्कार झाल्यामुळे मला मायेचा हात मिळाला त्यामुळे हा सत्कार मला मोलाचा  वाटतो ", असे मत सिंधुताई सपकाळ यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले. 
         पुण्याच्या महापौर सौ. चंचला कोद्रे आणि सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते सपकाळ यांचा सन्मान करण्यात आला. "पत्रवाळीतील एक घास समाजातील मोठ्या लोकांनी बाजूला ठेवला नाही, तर उद्या आपल्या ताटात घास राहणार नाही"  अशी खंत सिक्किमचे राज्यपाल श्रीनिवास पाटिल यांनी  व्यक्त केली .  ते पुढे म्हणाले, "अनाथ मुलांना पोटाशी धरून त्यांना मायेची उब देतांनाच अशा मुलांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम सिंधुताईनी केले." याप्रसंगी उपमहापौर बंडू गायकवाड, नगरसेवक आबा बागुल, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे यांची प्रमुख उपस्थिती  होती.  

पुस्तक प्रदर्शन सुरु

पुस्तक प्रदर्शन सुरु 

पुणे - 'पुणे बुक फेअर' च्यावतीने गणेश कला क्रीडा मंच,स्वारगेट येथे पुस्तक प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात केंद्र सरकार व राज्य सरकारने प्रकाशित केलेल्या तसेच इतर काही प्रसिद्ध प्रकाशन संस्थेची पुस्तके, विविध वृत्त्तपत्र समूहांची पुस्तके पहावयास मिळतील. 
     या पुस्तक प्रदर्शनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे बरचशी पुस्तके वाचकांसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. या पुस्तक प्रदर्शनाला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून २०ऑक्टोबर पर्यंत हे प्रदर्शन खुले राहील. हे प्रदर्शन सकाळी दहा ते रात्री आठच्या दरम्यान खुले राहील. 

पुण्यात होणार रौप्यमहोत्सवी बालकुमार साहित्य संमेलन

पुण्यात होणार रौप्यमहोत्सवी बालकुमार साहित्य संमेलन 
प्रशांत दामले यांच्या हस्ते संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण 

पुणे - "प्रत्येक मूल हे स्वतंत्र संमेलन असते, लहान मुलांमुळे घरातले वातावरण देखील उत्साही राहते. त्यामुळे त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा बाल कुमार साहित्य संमेलनाची गरज आहे", असे मत प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले. 
  संवाद संस्थेच्या वतीने पुण्यात होणाऱ्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण बुधवारी दामले यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. संवादचे अध्यक्ष सुनील महाजन, निकिता मोघे, नवीन इंदलकर, ल. म. कडू आदी यावेळी उपस्थित होते. गेली २४ वर्षे हे संमेलन दरवर्षी भरवण्यात येते. आतापर्यंत सोलापूर, जळगाव, इचलकरंजी, सातारा, परभणी, संगमनेर अशा महाराष्ट्रातील विविध भागांत ते झाले आहे. दि. २९, ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे हे संमेलन आयोजित करण्यात येणार आहे.